आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून पर्यटन विभागाचा निधी

महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध गावांसह पर्यटन विकासांतर्गत सुशोभीकरणासाठी मोठा निधी मिळाला आहे. मागील वर्षी आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून पर्यटन विभागाचा निधी मिळाला असून नवीन लोकप्रतिनिधीने या निधीचे श्रेय घेऊ नये असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सांगळे यांनी केले आहे.

सुभाष सांगळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाच्या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध तीर्थस्थळांच्या सुशोभीकरणासाठी व विकासासाठी मोठा निधी सातत्याने मिळवण्यात आला. याचबरोबर मागील वर्षी ऑक्टोबर 2024 पूर्वी पर्यटक विकास अंतर्गत विविध गावांकरता आमदार सत्यजित तांबे यांनी निधीची मागणी केली होती. देवकवठे गावातील जगदंबा माता परिसर सुशोभीकरण व घाट परिसरासाठी दोन कोटी रुपयांचा निधी आमदार सत्यजित तांबे यांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी तत्कालीन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागितला होता. त्यानुसार 12 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून हा प्रस्ताव मंत्रालयामध्ये पारित झाला.

मागील वर्षी आचारसंहिता आणि निधी अभावी हा निधी मिळू शकला नाही मात्र यावर्षी हा निधी मिळाला असून हा निधी मिळवण्यामध्ये आमदार सत्यजित तांबे यांचा पाठपुरावा आहे. नवीन लोकप्रतिनिधी हे फक्त पत्र देऊन मंत्र्यांसमवेत फोटो काढत आहेत. त्यांचा अद्याप एक रुपयाचा निधी आला नाही. हे तालुक्यातील सर्व जनतेला माहित आहे जो निधी मिळत आहे तो मागील वर्षीचाच आहे किंवा त्यासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केलेला आहे. नवीन लोकप्रतिनिधी यांनी नवीन निधी मिळवावा मग पत्रकबाजी करावी असे आवाहन युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष सांगळे यांनी केले आहे.

पर्यटन निधीसाठी आमदार तांबे यांचाच पाठपुरावा

आम्ही गावकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने आमदार सत्यजित  तांबे यांच्याकडे पाठपुरावा करून जगदंबा माता मंदिर सुशोभीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मागितला. त्यानंतर त्यांनी तातडीने यावर कार्यवाही करून आम्हाला पाठिंबा दिला. आता आम्हाला निधी मिळाला असून हा निधी मिळण्याचे श्रेय हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचेच असल्याचे या कामासाठी पाठपुरावा करणारे राजेंद्र कहांडळ यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *