हॉस्पिटलमध्ये जाऊन विद्यार्थिनीची आपुलकीने चौकशी
संगमनेर – डीग्रस येथील इयत्ता नववीत शिकणारी प्रगती सखाराम श्रीराम ही विद्यार्थिनी शाळेत जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रगतीची आपुलकीने चौकशी महाराष्ट्राचे मा.शिक्षण व जलसंधारणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन केली.


संगमनेर मधील कुटे हॉस्पिटलमध्ये प्रगतीला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रगतीशी संवाद साधला याचबरोबर तेथे उपस्थित पालक व प्रगतीचे मामा खेमनर यांच्याशी ही त्यांनी संवाद साधला.
डीग्रस येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी प्रगती ही सकाळी शाळेत जात होती. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये प्रगती गंभीर जखमी झाली. पाठोपाठ येत असलेले प्रगतीचे मामा देवराम खेमनर यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट मोटरसायकल शेतामध्ये घातली. हॉर्न वाजून मोठा आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने प्रगतीला सोडून पळ काढला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये प्रगतीच्या मानेला मोठ्या जखमा झाल्या आहेत. ही बातमी कळताच डिग्रस व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रगतीच्या तब्येतीची चौकशी केली. याप्रसंगी तिच्याशी संवाद साधून तिला खंबीर राहण्याचा सल्ला दिला याचबरोबर प्रगतीचे मामा देवराम खेमनर यांनी दाखवलेल्या धाडसाचेही त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या बिबट्यांचे वाढते हल्ले हे अत्यंत चिंताजनक आहे. बिबटे मानवी वस्तीत शिरत असून वन विभागाने यावर अत्यंत प्रभावी उपाय योजना करण्याचे गरजेचे आहे. याबाबत आपण वनमंत्र्यांशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व पालक यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.



