सावरगाव घुले येथे यात्रोत्सवानिमित्त आ. खताळ यांनी दिली भेट
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थान हे परिसरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान असून, या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश होणे आवश्यक आहे. यासाठी येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास आ.अमोल खताळ यांनी सावरगाव घुलेच्या ग्रामस्थांना दिला.

सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थानच्या यात्रोत्सवानिमित्त आ. खताळ यांनी भेट देत महाआरती केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. कार्यक्रमास देवस्थानचे अध्यक्ष सिताराम घुले, सचिव गोरक्षनाथ मदने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत घुले, उपसरपंच नामदेव घुले व्यापारी अमित राठी ,सोसायटीचे अध्यक्ष संतोष घुले, भानुदास बो-हाडे पत्रकार बाबासाहेब कडू शरद घुले सचिन घुले बाळासाहेब घुले बन्सी मदने यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार खताळ यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीत क्रमांक मिळविल्याबद्दल मधुकर घुले यांचा सन्मानचिन्ह व श्रीखळ देऊन सन्मान करण्यात आला.
आमदार खताळ म्हणाले की, “या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश या पूर्वीच व्हायला हवा होता. मात्र वन विभागाच्या काही तांत्रिक अडचणीं मुळे हा प्रस्ताव प्रलंबित राहिला. आता या अडचणी दूर करून संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधत देवस्थानाला ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. अकलापूर आणि सावरगाव घुले या भागात बैलगाडा शर्यतीची परंपरा सर्वप्रथम सुरू झाली असून आजही ती जतन केली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. गावात ‘टँकरमुक्त’ झाल्याचा फलक पाहून समाधान वाटले. गेल्या सव्वावर्षाच्या कार्यकाळात प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत पोहोचून नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत,” असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

“राजस्थान राज्याने पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास साधला आहे. त्याच धर्तीवर संगमनेर तालुक्यातही पर्यटनवृद्धीस मोठी संधी उपलब्ध आहे. सावरगाव घुलेसह पठार भागातील धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक स्थळांचा नियोजनबद्ध विकास केल्यास या भागाला नवे आर्थिक बळ मिळू शकते. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. त्यामुळे देवस्थानांचा विकास, पायाभूत सुविधा आणि पर्यटनदृष्ट्या आवश्यक सोयी-सुविधा उभारण्यावर विशेष भर दिला जाणार आहे,”
(अमोल खताळ – आमदार, संगमनेर विधानसभा)



