मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या उपोषणाची सांगता

  • मंत्री प्रसाद लोढा यांनी उपोषणस्थळी येऊन सोडवले आंदोलन
  • मागण्यांचा जीआर निघेपर्यंत लढा सुरूच राहणार : संदीप काळे

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पत्रकार व पत्रकारितेशी संबंधित ३३ मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे सुरू असलेले उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी व आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देत उपोषणाची सांगता केली.

अधिवेशन सुरू झाल्यापासून ‘व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने हे उपोषण सुरू होते. १५ व १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात वर्तमानपत्र, टीव्ही, रेडिओ आणि डिजिटल मीडियासंदर्भातील ३३ मागण्यांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले होते. या ठरावांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी संपूर्ण पदाधिकारी साखळी उपोषणावर बसली होती.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मागील चार दिवसांत उपोषणस्थळी अनेक मान्यवरांनी भेट दिली. यामध्ये १० आमदार, ३ खासदार आणि ४ माजी मंत्र्यांचा समावेश होता. संघटनेने पत्रकार व पत्रकारितेसाठी केलेले कार्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन प्रत्येक भेट देणाऱ्या मान्यवरांनी दिले.

दरम्यान, माजी मंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून उपोषणस्थळी आले. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला हे उपोषण सोडवण्यासाठी पाठवले आहे. आपल्या मागण्या मान्य केल्या जातील,” असे आश्वासन त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने दिले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी केलेले कार्य नोंद घेण्यासारखे असून, संघटनेने असेच काम पुढे सुरू ठेवावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

यानंतर मंत्री लोढा यांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, विश्वस्त व महाराष्ट्र समन्वयक किशोर कारंजेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल मस्के, नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे आणि राज्य कोअर कमिटीचे प्रमुख कल्पेश महाले यांना ज्यूस देऊन उपोषणाची अधिकृत सांगता करण्यात आली.

यावेळी बोलताना संदीप काळे म्हणाले की, संपूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन सविस्तर भूमिका मांडली जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, जोपर्यंत मागण्यांचा शासन निर्णय (GR) निघत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

उपोषणाच्या सांगतेवेळी ‘व्हॉईस ऑफ मीडिया जिंदाबाद’च्या घोषणांनी यशवंत स्टेडियम परिसर दणाणून गेला. आंदोलनात सहभागी सर्व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह दिसत होता. पत्रकारांनी पत्रकारितेसाठी उभा केलेला हा लढा महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, विश्वस्त व महाराष्ट्र समन्वयक किशोर कारंजेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल मस्के, नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे, राज्य कोअर कमिटीचे प्रमुख कल्पेश महाले यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *