- पिढ्यान पिढ्यांसाठीच्या विकास कामात राजकारण होणे दुर्दैवी
नाशिक – पुणे रेल्वे करता संगमनेर हा नैसर्गिक मार्ग आहे. या मार्गावरील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. जमिनीचे अधिग्रहण झाले. आणि त्यानंतर हा मार्ग बदलले हे दुर्दैवी आहे. कुणालातरी कोणीतरी शब्द दिला असेल आणि कुणाला तरी हा मार्ग दुसरीकडून न्यायचा असेल तर हे तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवी ठरणारे आहे. पिढ्यान पिढ्यांच्या विकासकामांमध्ये राजकारण करणे हे अत्यंत दुर्दैवी असून नाशिक – पुणे रेल्वे ही प्रास्तावित संगमनेर मार्गेच झाली पाहिजे अशी आग्रही मागणी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माध्यमांच्या प्रतिनिधींशी नाशिक – पुणे रेल्वे बाबत बोलताना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गे झाली पाहिजे याकरता आपण सातत्याने पाठपुरावा केला. त्या सर्व नियोजनामध्ये, स्टेशन उभारणीमध्ये, रेल्वे मार्गाच्या सर्वे मध्ये आपण सहभागी होतो. नाशिक पुणे संगमनेर हा रेल्वेसाठी नैसर्गिक मार्ग आहे. संगमनेर तालुक्यातून रेल्वे बाबत सर्वे झाला जमिनीच्या अधिग्रहण झाल्या. जमीन ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते तरीही शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. असे सगळे होऊन जर त्याचा मार्ग बदलवला जात असेल तर हे होणे दुर्दैवी आहे.
अकोले तालुक्याची मागणी आहे परंतु डोंगरी भाग जास्त असल्याने खर्च जास्त येतो. संगमनेर हा अत्यंत सर्वांच्या सोयीचा मार्ग आहे. तिथून विमानतळ जवळ आहे. शिर्डी जवळ आहे. लोणी जवळ आहे या सर्वांना संगमनेर मार्ग सोयीचा आहे. मात्र राजकारणासाठी मार्ग बदलले हे काही चांगले नाही. राजकारणासाठी इतर वर्ष आहेत. पुढील शंभर वर्षांच्या पिढ्यांचे भवितव्य या विकास कामांमधून ठरत असते त्यामुळे हा मार्ग बदलले अत्यंत दुर्दैवी आहे.
निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. यामधून येणारी समृद्धी ही पुढील पिढ्यांची उज्वल भविष्य करणारी आहे. निळवंडे धरणामुळे संगमनेर, अकोले,राहाता, राहुरी, सिन्नर या भागातील दुष्काळी गावांना पाणी मिळाले आणि त्याचा फायदा झाला आहे. अकोलेतील शेतकऱ्यांचा त्याग आहे. त्यांनाही पाणी दिले आहे. अशा विकास कामात राजकारण कधी करू नये कारण पुढील अनेक पिढ्यांचे भविष्य उज्वल यातून होत असते. एक निळवंडे धरण किंवा एक भंडारदर्यामुळे आपला जिल्हा विकसित झाला आहे. आणि असे पायाभूत विकासाचे काम तालुक्याच्या आणि त्या विभागाच्या विकासाला दिशा देणारे असते.
पुढील अनेक पिढ्यांसाठी नाशिक पुणे रेल्वे ही अत्यंत महत्त्वाची आहे. रेल्वेमुळे श्रीनगर ते रामेश्वरम आणि कलकत्ता ते अहमदाबाद असे सर्व ठिकाणी जोडले जाणार आहेत. हे सर्वांना सोयीचे आहे. कोपरगाव आणि श्रीरामपूरला सुद्धा रेल्वे आहे. संगमनेर मुळे शिर्डी लोणी या सर्वांना मदत होणार आहे. त्यामुळे नाशिक पुणे रेल्वेच्या मार्गात झालेला बदल हा अत्यंत निषेधार्य असून नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर या नियोजित मार्गे झाली पाहिजे हा आमचा आग्रह असल्याचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
माणसांना अभय देण्याचा कायदा करावा
सह्याद्रीच्या पायथ्याशी बिबट्यांचा वावर खूप वाढला आहे. माणसांवर हल्ले होत आहेत. मुलांना बाहेर खेळणे अवघड झाले आहे. प्राण्यांना अभय देण्यासाठी अभयारण्य आहे व कायदा आहे. तसा आता माणसांना अभय मिळण्याकरता कायदा करणे गरजेचे असून पहिले माणसांना अभय द्या आणि मग प्राण्यांना द्या अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून बिबट्यांना खाण्यासाठी जंगलामध्ये शेळ्या सोडणार यावर बोलताना ते म्हणाले की, या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार होईल शेळ्या जंगलात सोडल्या आणि त्या बिबट्यांनी खाल्ल्या हे सोपे कारण भ्रष्टाचाराला मिळेल असे ते म्हणाले.



