- नान्नज दुमाला, पिंपळे परिसरा करता असलेल्या जलसिंचन योजनांची स्थगिती रद्द करा
- पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे आणण्याचे फार दिवसापासून जनता ऐकते
निवडणुका संपल्या की इथले राजकारण संपते अशी परंपरा आहे. आपण कधीही राजकीय भेदभाव केला नाही. सर्वांना सोबत घेतले सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरण निर्माण केले. कारखान्याच्या माध्यमातून भोजापुर चारी निर्माण करण्यात आली. दरवर्षी पाणी देण्यासाठी प्रयत्न केला. यावर्षी जास्त पाऊस झाल्याने पाणी आले. हे एका वर्षात झाले नाही. ज्यांचे योगदान नाही ते लोक आता बोलत आहेत. निळवंडे चे काम जनतेने विसरावे म्हणून भोजपुरचा बोलबाला केला जात असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून आपण मंजूर केलेल्या उपसा जलसिंचन योजनांची स्थगिती रद्द करून तातडीने कामे सुरू करा अशी मागणी त्यांनी केली आहे.




पिंपळे येथे विविध सहकारी सेवा सोसायटीच्या लोकार्पण प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते, तर व्यासपीठावर जिल्हा बँकेचे चेअरमन ॲड माधवराव कानवडे ,पांडुरंग पाटील घुले, आर्किटेक बी आर चकोर, अजय फटांगरे, महंत बुवाजी बाबा पुणेकर, महंत बबनराव सांगळे ,संपतराव गोडगे ,धनराज गुट्टे, संजय फड, ॲड ज्ञानेश्वर सांगळे, सुभाष सांगळे,रोहिदास सानप, ज्ञानेश्वर सानप, देवराम गुळवे, जनार्दन कासार, त्रंबक गडाख, डॉ दत्तात्रय गडाख, साहेबराव गडाख, रमेश सानप, पांडुरंग फड , सखाराम शर्माळे, सोसायटीचे चेअरमन शिवनाथ कोटकर ,सरपंच मीनाताई कोटकर आदींसह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, यावर्षी मे महिन्यापासून चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे पाणी आले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून भोजापुर चारी निर्माण झाली. ते स्वतः भर उन्हात चारी कामावर येऊन बसायचे. भोजपूर चारी 1992 मध्ये कारखान्याने 82 लाख रुपये खर्च करून तयार केली. मंत्री पदाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळा निधीचारीसाठी टाकला आणि पाणी दरवर्षी पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न आपण केले.





यावर्षी पाऊस चांगला झाला या आनंदाची गोष्ट आहे ही चारी मागील एक वर्षात झाली नाही ज्यांना कधी चारी माहीत नव्हती ते आता येऊन भाषण करत आहेत. निळवंडे धरण जनतेने विसरावे म्हणून भोजापूरचा बोलबाला करत आहे. या भागाला पाणी मिळावे याकरता आपण सातत्याने प्रयत्न केला असून निळवंडे कालव्यांमधून उपसा जलसिंचन योजना मंजूर केल्या होत्या. यामध्ये निमोन, पळसखेडे, क- हे, नान्नज दुमाला ,सोनोशी, काकडवाडी ,पारेगाव बुद्रुक, पारेगाव खुर्द, तळेगाव, तिगाव , बिरेवाडी यांच्यासह 11 गावांचा समावेश आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर या मंडळीने उपसा जलसिंचन योजना रद्द केल्या. या उपसा जलसिंचन योजनेतून या भागाला पाणी देणे शक्य आहे त्यासाठी आपण नियोजन केले होते त्यामुळे तातडीने त्या सुरू कराव्यात. जे काम होईल त्याबाबत आपण नेहमी बोललो.
पश्चिमेकडून पूर्वेकडे पाणी येईल तेव्हा आनंदच आहे आणि जनता हे खूप दिवसाची ऐकत आहे. चाळीस वर्षात सातत्याने काम केले तालुका उभा केला. विकासाच्या योजना राबवल्या सुसंस्कृत आणि वैभवशाली तालुका म्हणून राज्यात ओळख निर्माण केली. सध्या शहरात व तालुक्यात अवैध धंदे वाढले आहेत येणारी पिढी उध्वस्त होते कि काय याची चिंता निर्माण झाली आहे यामागे कोण आहे ते ओळखा. हे सर्व आपल्याला दुरुस्त करायचे असून सर्वांनी शास्वत विकासाच्या पाठीशी भक्कम उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.
तर खासदार वाकचौरे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा राज्यातील अत्यंत विकसित आणि सुरक्षित तालुका म्हणून ओळखला जातो. विधानसभा निवडणुकीत जे झाले त्याची चिंता आणि काळजी संपूर्ण राज्याला पडली आहे. लोकनेता कायम हा जनतेमध्ये राहणार असतो. समोरचे लोक येतील भूलथापा देतील कारण त्यांना जनतेशी घेणे देणे नसते. आपण कायम सर्वांनी एकजुटीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
तर ॲड माधवराव कानवडे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकाराचा संस्कार असलेला हा तालुका आहे गावोगावी असलेल्या सेवा सोसायटी आणि मधून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे.
तर बी आर चकोर म्हणाले की, निमोन आणि परिसरासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम विकासाच्या योजना राबविल्या आहेत पाच गावांची पाणीपुरवठा योजना अत्यंत अडचणीच्या काळात त्यांनी मंजूर करून सर्वांना ग्रॅव्हिटी द्वारे पाणी दिले .याचबरोबर भोजापुर चारीतून पाणी देण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला. यावर्षी पिंपळे धरणात पाणी आले नाही ही अत्यंत दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.
यावेळी विविध कार्यकर्त्यांनी आपली मनोगती व्यक्त केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी आर चकोर यांनी केले सूत्रसंचालन राजेंद्र कहांडळ व अनिल घुगे यांनी केले तर सोसायटीचे चेअरमन शिवनाथ कोटकर यांनी आभार मानले यावेळी पंचक्रोशीतील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बी आर चकोर यांच्या पुढाकारातून पाच गावांसाठी पाणीपुरवठा योजना
निमोण ,सोनेवाडी ,पळसखेडे ,क-हे व पिंपळे या गावांकरता आर्किटेक बिहार चकोर यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. मंत्रालयात फायलींचा पाठपुरावा केला यामुळे नागरिकांना पाणी मिळाले असून बी आर चकोर यांनी या विभागाच्या विकासासाठी सातत्याने काम केले असून त्यांना दीर्घायुष्य मिळो अशा शुभेच्छा वाढदिवसानिमित्त लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.



