आय लव संगमनेरच्या वतीने 2022 विद्यार्थ्यांची पोलीस सराव परीक्षा संपन्न

  • संगमनेर हे पोलीस भरतीचे हब – उमेश रुपनवर
  • पोलीस प्रशिक्षणासाठी राज्यभरातून तरुण संगमनेर मध्ये – आमदार सत्यजित तांबे

महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुका हा सुसंस्कृत व विकसित तालुका म्हणून राज्यात ओळखला जात आहे. जिव्हाळा आपुलकी आणि प्रेम हे संगमनेर करांचे वैशिष्ट्य असून शैक्षणिक केंद्राबरोबर संगमनेर हे पोलीस प्रशिक्षणाचे हब म्हणून राज्यात नावारूपास आले असल्याचे गौरवोद्गार सह्याद्री अकॅडमी बारामतीचे संचालक उमेश रुपनवर यांनी म्हटले आहे. तर पोलीस प्रशिक्षणासाठी राज्यभरातून हजारो तरुण संगमनेर मध्ये येत असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे आय लव संगमनेर चळवळीच्या वतीने आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या सराव परीक्षेमध्ये 2022 युवक व युवतींनी सहभाग घेतला यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आयोजक आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, डॉ. मैथिलीताई तांबे, तसेच रॉयल अकॅडमी, साई करिअर अकॅडमी, आर्यस अकॅडमी नाशिक, शौर्य अकॅडमी, जय हिंद अकॅडमी , ज्ञानराज अकॅडमी, आर्या अकॅडमी, एस के अकॅडमी व मातोश्री अकॅडमीचे संचालक उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांची लेखी सराव परीक्षा घेण्यात आली. 

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की,  विविध अकॅडमीमुळे संगमनेर हे पोलीस भरती केंद्र ठरले आहे. राज्यभरातून विद्यार्थी येथे येत आहेत. नागपूर ते मुंबई असे राज्यातून सुमारे सात हजार विद्यार्थी संगमनेर मध्ये अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे शिक्षणाचे व सहकाराचे केंद्र बनले आहे. येथील जिव्हाळा आणि प्रेम यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये आपलं कौटुंबिक नाते निर्माण झाला आहे.

संगमनेर बद्दल तुम्हा सर्वांना वाटणारा आदर हा नक्कीच संगमनेर करांसाठी आनंदाचा आहे. पोलीस भरतीसाठी सामान्य कुटुंबातील मुले येत असतात. प्रतिष्ठा स्थैर्य आणि पगाराची शाश्वती ही सरकारी नोकरीतील वैशिष्ट्य असून प्रत्येकाने नोकरीत लागल्यानंतर आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवा भ्रष्टाचारापासून दूर राहा चुकीचे काम कोणी करत असेल तर त्याला थांबवा. चुकीचे काम करण्यासाठी तुमच्यावर दबाव आला तर तुमच्या आई-वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आला म्हणजे भ्रष्टाचार आणि चुकीचे काम होणार नाही असे सांगताना कष्ट करा प्रामाणिक रहा जीवनामध्ये सर्वात समाधानी तुम्ही राहाल असे ते म्हणाले. 

तर उमेश रुपनवर म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे समृद्ध शहर म्हणून राज्यात लौकिकास्पद ठरले आहे. हजारो विद्यार्थी राज्यभरातून येथे येत आहे .ते फक्त आपुलकीमुळे.आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवकांना मोठी संधी येथे निर्माण करून दिली जात आहे. यावर्षी सुमारे साडेबारा हजार पोलीस कॉन्स्टेबल पदांची भरती होणार असून या भरतीत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाची रणनीती बदलावी लागणार आहे. जगाला अपयशाचे स्पष्टीकरण नको असते यशाच्या खुलासा हवा असतो कारण देणारी माणसं कधीही यशस्वी होत नाही असे सांगताना विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे याचबरोबर लेखी परीक्षा मैदानी परीक्षा कशी द्यावी याबाबतची सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले. 

तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा देशाला आदर्शवत ठरला आहे याचबरोबर शिक्षणामध्ये मोठी क्रांती झाली आहे .आणि अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येथे काम होत आहे. सरकारी नोकरीमध्ये जा. प्रामाणिकपणे काम करा भ्रष्टाचारापासून मुक्त राहा. आज भारत महासत्ता होण्याच्या गप्पा मारल्या जातात परंतु वाढलेल्या भ्रष्टाचार ही मोठी समस्या असल्याचे ते म्हणाले.

यावेळी आय लव संगमनेर चळवळीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सत्यजित तांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ दुर्गाताई तांबे यांनी केले. यावेळी संगमनेर शहरातील विविध अकॅडमीचे सुमारे 2700 विद्यार्थी उपस्थित होते तर या सराव परीक्षेत 2022 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *