श्रीगोंदा – सहकार महर्षी स्व. शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने 2024-25 गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाबाबत सभासद शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मोठा दिलासा जाहीर केला आहे. कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले की, सुमारे ४ लाख ७६ हजार ५८९.२४६ मेट्रिक टन गाळपावर प्रति मेट्रिक टन २५० रुपयांनुसार तब्बल ११ कोटी ९२ लाख रुपये ऊस प्रोत्साहन अनुदान म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम १३ ऑक्टोबरपूर्वी थेट खात्यात जमा होणार असून, सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा कारखान्याचा हेतू आहे.

राजेंद्रदादा नागवडे म्हणाले की, “कारखान्याने गळीत हंगामात शेतकऱ्यांना एफ.आर.पी.सह प्रति मेट्रिक टन २८०० रुपये पूर्णपणे अदा केलेले आहेत. तथापि, सभासदांना दिलेल्या आश्वासनानुसार अतिरिक्त २५० रुपये प्रति टन दराने ऊस प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. कारखाना अडचणींवर मात करूनही शेतकऱ्यांशी केलेले वचन पाळत आहे.” यासोबतच कारखान्यातील कामगारांना ८.५०% बोनस दिवाळीपूर्वी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सभासदांना साखर वाटपाची सुविधा-
दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील सर्व सभासदांना दिवाळी निमित्त १० किलो साखर केवळ २० रुपये प्रति किलो दराने देण्यात येणार आहे. यासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी, घारगाव, इनामगाव आणि कारखाना साईट या सहा ठिकाणी ५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरदरम्यान साखर वाटप सुरू राहील. सभासदांनी आधारकार्डसह संबंधित केंद्रावर जाऊन साखर घ्यावी, अन्यथा नंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही. मयत सभासदांच्या नावावर साखर दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
‘शेतकऱ्यांचा विश्वास हा कारखान्याचा आधार’-
स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांच्या सहकारविचारांचा वारसा घेऊन कारखाना सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आल्याचे राजेंद्र नागवडे यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, “नागवडे कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांना रास्त व शाश्वत ऊसभाव दिला आहे. भविष्यातही हा विश्वास अबाधित ठेवला जाईल. येणाऱ्या गळीत हंगामातही नागवडे कारखाना ऊस भावात कुठेही मागे राहणार नाही. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस नागवडे कारखान्याकडेच देऊन सहकार्य करावे.”
या वेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, संचालक मंडळ सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी – गणेश कविटकर



