- संगमनेरला विक्रमी गर्दीत रावण दहन संपन्न
- ‘मालपाणी’ च्या पुढाकाराने विजयादशमीची अनेक दशकांची परंपरा!
- रचना मालपाणींच्या संकल्पनेतून हजारो रोपांचे विनामूल्य वाटप!
‘विजयादशमी तथा दसऱ्याच्या निमित्ताने संगमनेर मध्ये अनेक दशकांपासून शमी वृक्षाच्या पूजनाची आणि रावण दहनाची अनोखी परंपरा संगमनेर मधील हजारो नागरिकांच्या सहकार्याने व सहकुटुंब सहपरिवार सहभागामुळे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे.’ असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी येथे केले.

सालाबाद प्रमाणे मालपाणी इंडस्ट्रियल पार्क समोरील शिवशक्ती परिसरामध्ये भव्य ३१ फूट उंचीच्या रावणाचे दहन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना श्री मालपाणी यांनी हे उद्गार काढले.
यावेळी व्यासपीठावर मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, डॉ. संजय मालपाणी, गिरीश मालपाणी, हर्षवर्धन मालपाणी, सौ इशिता मालपाणी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. साडेसात वाजता मालपाणी परिवारातील नूतन सुनबाई सौ. इशिता यांच्या हस्ते रावणाच्या दिशेने बाण सोडण्यात आला. क्षणार्धात रावण भस्मसात झाला आणि हे अद्भुत दृश्य पाहणाऱ्या हजारो संगमनेर करांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ ‘जय श्रीराम ’अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून टाकला.
यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. हजारो संगमनेरकर हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये साठवून घेताना दिसले. रावण दहनापूर्वी व्यासपीठावर शिर्डी येथील मालपाणी वेट एन जॉय वॉटर पार्क तसेच साई तीर्थ थीम पार्क मधील कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसी पद्धतीचे ऍक्रोबॅट कसरतींचे सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. डॉ. संजय मालपाणी यांनीही यावेळी समायोचित भाषण केले. त्यांनी सादर केलेल्या हिंदी कवितेला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. स्वागत, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मुरारी देशपांडे यांनी केले.
मालपाणी इंडस्ट्रियल पार्कच्या आवारामध्ये व्यवस्थापक रमेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक देखावे उभारण्यात आले होते. हजारो संगमनेरकरांनी या देखाव्यांचा मनमुराद आनंद घेतला. प्रभू श्रीराम पंचायतन, महिषासुर मर्दिनी, नवदुर्गा, विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, शंकर पार्वती नंदिकेश्वर अशा विविध देवदेवतांच्या भव्य आणि आखीव रेखीव मूर्ती सर्वत्र मांडून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विशेष लक्षवेधी बाब म्हणजे अनेक वर्षांपासून मालपाणी फार्मच्या संचालिका सौ.रचना मालपाणी आणि इनरव्हील क्लबच्या त्यांच्या सहकारी महिला यांच्या वतीने सर्वांना येथे हजारो रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात येते. या माध्यमातून प्रत्येक घराला वृक्षारोपण, वनसंवर्धन आणि पर्यावरण प्रेमाचे महत्त्व पटवून देण्यात आम्ही यशस्वी होत असल्याचा खूप आनंद आहे. विजयादशमीच्या निमित्ताने निसर्गाच्या समृद्धीचा हा वसा घरोघर पोहोचविण्यात आम्हाला यश येते याचे खूप समाधान असल्याची भावना सौ मालपाणी यांनी व्यक्त केली.
मालपाणी परिवारातील श्रीमती ललितादेवी, सुवर्णा मालपाणी, संगीता मालपाणी, अनुराधा मालपाणी, सुनीता मालपाणी, शैला पलोड आदी यावेळी उपस्थित होत्या. सकाळी संजय मालपाणी व अनुराधा मालपाणी यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली आणि शमी वृक्षाचे वेदमंत्रांच्या घोषात विधिवत पूजन करण्यात आले.
अनेक संगमनेर करांनी मालपाणींच्या नियोजनाचे मुक्त कंठाने कौतुक केले. एकाच वेळी हजारो संगमनेरकर सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आलेले असताना देखील कुठेही जरा देखील गडबड, गोंधळ धक्काबुक्की वगैरे प्रकार अजिबात घडले नाहीत. सुरक्षेची देखील अनेक दशकांची परंपरा आहे. मालपाणी उद्योग समूहातील सुरक्षा विभागाने सर्वत्र काटेकोर बंदोबस्त ठेवला होता. रावण दहन ठिकाणाच्या जवळच दोन सुसज्ज रुग्णवाहिका प्रथमोपचाराच्या पेट्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली होती. अगदी तान्ह्या बाळापासून तर ९० वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनीच कोणत्याही त्रासाविना आणि अडचणी विना येथे विजयादशमी साजरी केली यावरून या नियोजनाची यशस्विता लक्षात येते. व्यवस्थापक रमेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा सुव्यवस्थित व सुनियोजित रीतीने संपन्न व्हावा यासाठी अनेक समित्या मागील दहा दिवसांपासून परिश्रम घेत होत्या.



