महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठां पैकी महत्त्वाच्या असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सप्तशृंगी गडावर लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद लोक चळवळीच्या वतीने 55 हजार देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले असून सप्तशृंगी मातेला जयहिंदच्या वतीने नवरात्र निमित्त पर्यावरण पूरक सेवा अर्पण करण्यात आली आहे.



वणी येथील सप्तशृंगी गडावर महाराष्ट्र शासन आणि नाशिक एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट ग्रामपंचायत व जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने 55 हेक्टर क्षेत्रामध्ये 55 हजार देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. नवरात्र उत्सव हा संपूर्ण देशामध्ये अत्यंत मोठ्या आनंदाने साजरा होतो. सप्तशृंगी गडावर भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी असून नवरात्रीच्या काळामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. हा डोंगर परिसर हिरवाईने नटावा निसर्ग संपन्न व्हावा याकरता जयहिंद लोक चळवळीने पुढाकार घेतला असून सप्तशृंगी गडावरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असून याच्या संगोपनाची जबाबदारी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टने घेतली आहे. यामध्ये पिंपळ, उंबर, लिंब, वड, याचबरोबर औषधी वनस्पतींचाही समावेश आहे.
सप्तशृंगी गडाच्या चारही बाजूने महाराष्ट्र शासनाचा वन विभाग व जयहिंद च्या वतीने चर खोदाई करून शास्त्रोक्त पद्धतीने या वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे याचबरोबर पाण्याची व्यवस्था व्हावी याकरता ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्यात आले आहे. तसेच वृक्षांच्या रक्षणाकरता सेवाभावी पद्धतीने वृक्षारक्षकाची नियुक्ती ही करण्यात आली आहे. या कामी ग्रामपंचायत ही मोठे सहकार्य लाभले आहे.
याबाबत जयहिंदचे संस्थापक मा.आ.डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सजीव सृष्टीच्या रक्षणाकरता दंडकारण्य अभियान ही पर्यावरण चळवळ सुरू केली. या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील उघड्या बोडक्या डोंगरांवर कोट्यावधी बियांचे रोपण करण्यात आले असून लाखो वृक्षांची रोपण झाले आहे. यामुळे तालुक्यात हिरवाई वाढली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही पर्यावरण चळवळ सह्याद्री ते सातपुडा पोहोचली असून एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या पुढाकारातून सप्तशृंगी गडावर वृक्षारोपण करण्यात आले आहे.




या वृक्षांमुळे या परिसरातील तापमान कमी होण्यास मदत होणार असून देशी झाडांमुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढणार आहे. त्याचप्रमाणे हिरवाई वाढणार आहे. निसर्गाचे संवर्धन ही प्रत्येकाची प्राथमिक जबाबदारी असून सप्तशृंगी मातेच्या चरणी जयहिंद लोक चळवळीच्या वतीने ही पर्यावरण पूरक सेवा केली जात असल्याचे ते म्हणाले.
तर दंडकारण्य अभियानाचे समन्वयक प्राचार्य दशरथ वर्पे म्हणाले की, स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे वृक्षारोपण व संगोपन होत असून येणाऱ्या दोन तीन वर्षांमध्ये हा परिसर आणखी हिरवा होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
सप्तशृंगी गड परिसर वृक्षारोपण व संगोपणासाठी निवडल्याने सप्तशृंगी देवस्थान ट्रस्ट व गडावरील ग्रामस्थांनी महाराष्ट्राचे मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन केले आहे.



