दंडकारण्य अभियानातून हर्मन हिल्स वर 40765 देशी वृक्षांचे संवर्धन

हर्मन हिल्स ठरते आहे निसर्ग प्रेमींसाठी आकर्षण, पिंपरने येथील हर्मन हिल्स निसर्ग पर्यटन केंद्र

जलसंधारणाचे मोठे काम करणारे फादर हर्मन बाकर यांच्या स्मरणार्थ पिंपरणे शिवारातील डोंगराला हर्मन हिल्स नाव देण्यात आले असून दंडकारण्य अभियानांतर्गत या हिलवर 40765 देशी वृक्षांचे रोपण करण्यात आली असून आता ही वृक्ष मोठी झाल्याने तालुक्यातील निसर्गप्रेमींसाठी हरमन हिल हे मोठे आकर्षण केंद्र ठरत आहे.

80 च्या दशकात स्वित्झर्लंड येथील जलसंधारण तज्ञ फादर हार्मन बाकर यांनी संगमनेर तालुक्यामध्ये जलसंधरणाचे मोठे काम केले. स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हार्मन बाकर यांनी एकत्र येऊन तालुक्यातील मेंढवण, कोळवाडे, म्हसवंडी व पठार भागात जलसंधारणाचे मोठे काम केले. निसर्ग संपन्न अशा स्विझर्लंड मधून येऊन संगमनेर तालुक्यासारख्या दुष्काळी भागामध्ये काम करणारे हरमन बाकर यांनी केलेल्या कामाच्या स्मरणार्थ लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पिंपरणे व कोळवाडे शिवाराच्या मध्यावर येथील डोंगराला हरमन हिल हे नाव दिले.

या डोंगराच्या साठ एकर परिसरामध्ये लोकनेते माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ.दुर्गाताई तांबे,आमदार सत्यजित तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने दंडकारण्य  अभियानांतर्गत 40765 देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. पूर्व पश्चिम अगदी रांगेमध्ये झालेल्या या वृक्षारोपणामध्ये दोन रांगांमध्ये सुमारे वीस फुटाचे अंतर सोडण्यात आले आहे. संपूर्ण डोंगर हा विविध देशी झाडांनी बहरला असून त्यांना भर उन्हाळ्यातही ठिबक सिंचन द्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये फळझाडे,फुलझाडे,साग यांसह विविध देशी झाडांचा समावेश आहे. ही सर्व झाडे आता सात फुटाच्या पुढे वाढली असून हिरव्यागार वनराई मध्ये मोर, लांडोर, हरीण याचबरोबर विविध जंगली प्राण्यांचा वावरही वाढला आहे.अधून मधून बिबट्याचे दर्शनी होत आहे.

निसर्ग रम्य अशा सह्याद्रीच्या पर्वत रांगेत हर्मन हिल हिरवीगार झाली असून या डोंगरावर गेल्यानंतर संपूर्ण संगमनेर तालुक्याचे दर्शन होते. एका बाजूला डोंगर रांगा तर दुसऱ्या बाजूला प्रवरा माईने हिरवे केलेले रान शिवार संगमनेर पासून साधारण 14 किलोमीटर अंतरावर असलेले हे हर्मन हिल्स संगमनेर व इतर तालुक्यातील नागरिकांसाठी निसर्ग पर्यटन केंद्र ठरत आहे. संगमनेर खुर्द – जाखुरी मार्गे या हिलवर जाता येत असून या ठिकाणी चांगली सुविधा असल्याने अनेक नागरिक या निसर्गरम्य केंद्राला भेट देत आहेत.

तापमान कमी होण्यास मोठी मदत

पिंपरणे,कोळवाडे,अंभोरे परिसरात असलेल्या हर्मन हिल्स वरील विविध देशी वृक्षांमुळे हिरवाई वाढली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने वृक्षांची निगा राखली जात आहे. सुमारे 50 हजार वृक्षांमुळे आता हा डोंगर संपूर्ण हिरवा गार झाला असून या परिसरात पर्जन्यमान वाढीसह तापमान कमी होण्यास मोठी मदत झाली असल्याचे दंडकारण्य अभियानाचे समन्वयक प्राचार्य दशरथ वर्पे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *