स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने इतिहास, संस्कृती आणि वारसा जपण्याच्या उद्देशाने एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला. तालुक्यातील दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत इतिहास विषयात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कळमकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, घारगाव, पिंपळगाव पिसा, घोटवी, वडाळी आणि श्रीगोंदा अशा सात गावांमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

या उपक्रमात प्रा. भरत खोमणे, अविनाश निंभोरे, संकेत नलगे, संकेत लगड, राजेंद्र भापकर, गायकवाड सर, ईश्वर कोठारे, आविष्कार इंगळे आणि संजय पंधरकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा सन्मान केला. दरम्यान, पेडगाव येथे धर्मवीरगड किल्ल्यावर ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झाला. राहुल वडमारे, अजित दळवी, अमोल बडे, दिगंबर भुजबळ आणि पेडगाव जुने शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकावून भारतमातेप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा झालेला हा सन्मान त्यांना इतिहास विषयाविषयी अधिक प्रेरणा आणि अभ्यासाची नवी दिशा देणारा ठरला. आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी तरुण पिढीला मार्गदर्शन व स्फूर्ती देणारा हा उपक्रम भविष्यातील राष्ट्रनिर्मितीत महत्त्वाचा ठरेल, असे मत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कळमकर यांनी व्यक्त केले.
(प्रतिनिधी – गणेश कविटकर)



