नाफेड कांदा खरेदी प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे – माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात

  • कांद्याला 3 हजार रुपये कमीत कमी भाव मिळाला पाहिजे – मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात
  • शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, नाशिकमध्ये भर पावसात शेतकऱ्यांसाठी आंदोलन

नाशिक जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. येथे झालेले सर्व शेतकरी आंदोलने हे देशात पोहोचले आहे. नाफेड मध्ये कांदा खरेदी प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून कांद्याला कमीत कमी 3 हजार रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

नाशिक येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने नाफेड भवनावर भर पावसामध्ये भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार डॉ शोभाताई बच्छाव, अर्थशास्त्र विभाग प्रमुख विश्वास उठगे, प्रदेश काँग्रेसचे राजाराम पानगव्हाणे ,शरद आहेर ,जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, प्रा .ज्ञानेश्वर गायकवाड, मोहन तिवारी, रमेश कहांडूळे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, निर्मलाताई खरडे, आदिवासी विभागाचे लकी जाधव, शहराध्यक्ष स्वाती जाधव ,युवा काँग्रेसचे स्वप्निल पाटील, संतोष ठाकूर, किसान सेलचे संतू पाटील जायभाये, अल्तमस शेख, गौरव पानगव्हाणे, गौरव सोनार ,तनवीर तांबोळी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

भर पावसामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भर पावसात मोर्चात बोलताना माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध निवडून देणारा हा नाशिक जिल्हा आहे. क्रांतीकारकांचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन राज्यात नव्हे तर देशात पोहोचले आहे. नाफेड मध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे .कोणाच्या आशीर्वादाने हा भ्रष्टाचार चालतो आहे याची चौकशी झाली पाहिजे.

शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन हे एनसीसीएफ मार्फत खरेदी झाली पाहिजे. मात्र तसे होत नाही. या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांनी स्थापन केलेल्या संस्था आता त्यांच्या राहिल्या नसून व्यापारी व भांडवलदारांनी घेतल्या आहे . या संस्थांमध्ये राजकीय पुढारी, मोठे अधिकारी, व्यापारी, धन दांडगे लोक आले आहेत.शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात या बोगस संस्था आल्या कशा, यांना परवानगी दिल्या कोणी याची चौकशी झाली पाहिजे.

वीस तारखेला चांदवड येथे भव्य आंदोलन होणार असून सर्व शेतकरी व शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या पक्षांनी यामध्ये सहभागी व्हावे, केंद्रात आणि राज्यात मत चोरी करून सरकार सत्तेवर आली आहे .याबाबत खासदार राहुल गांधी यांनी आवाज उठवला असून सर्वपक्षीय एकत्र आले असून केंद्र सरकार घाबरले आहे. मत चोरीवर उत्तर दिले जात नाही. यावर जसे एकत्र आले तसे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन करताना अवसानात गेलेल्या संस्थांना खरेदी करण्याची परवानगी मिळते कशी हा मोठा प्रश्न असून नाफेड कांदा खरेदी प्रक्रियेतील गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे .याचबरोबर कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

विधानसभेमध्ये शेतकऱ्यांना मोठमोठे आश्वासने देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची उघड फसवणूक सुरू आहे. शेतकरी नैराश्यात आहे. आत्महत्या करत आहेत याला सर्वस्वी सरकार जबाबदार असून शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या वतीने हा लढा सुरू राहील असा इशाराही काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

भर पावसात आंदोलन

कांद्याला हमीभाव मिळावा. नाफेड कांदा खरेदी गैर प्रकारातील चौकशी व्हावी याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले भर पावसामध्ये या आंदोलन सुरू होते. यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणांनी परिसर दुमदुमून गेला या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची मोठी लक्षणीय उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *