श्रीगोंदा – गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत भक्तांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र पहारा देणारे पोलिस बांधव हेच खरे समाजरक्षक. स्वतःच्या कुटुंबाचा विसर पडून, ऊन–पाऊस–वादळ न पाहता ते नागरिकांच्या आनंदासाठी रस्त्यावर उभे असतात. पण या कर्तव्याच्या धावपळीत त्यांच्या पोटाची, त्यांच्या थकव्याची काळजी कोण घेणार? याच क्षणी व्हाईस ऑफ मीडियाच्या पत्रकारांनी पुढाकार घेतला आणि पोलिसांच्या सेवेला ‘ममतेचा स्पर्श’ देत प्रेमाने भरलेली जेवणाची पाकिटे त्यांच्या हाती दिली.

शनिवारी स्थानिक पोलिस ठाण्यात हा उपक्रम पार पडला. पोलिस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे व पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या हस्ते जेवण पॅकेटचे वितरण करण्यात आले. या वेळी लोखंडे म्हणाले “कर्तव्य बजावताना पोलिसांना वेळेवर जेवण मिळत नाही. परंतु पत्रकारांनी ही गरज ओळखून केलेली मदत आमच्यासाठी केवळ जेवण नाही, तर आधार आणि आपुलकीची खरी भावना आहे.”
व्हाईस ऑफ मीडिया अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी सांगितले “गणेश विसर्जनाच्या दिवशी पोलिस बांधव दिवस–रात्र सतर्क राहतात. वेळेवर न मिळालेलं जेवण आणि त्यातून येणारा ताण – तणाव त्यांच्या आरोग्यास घातक ठरतो. त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक संदीप काळे, कार्यकारिणी सदस्य गोरक्षनाथ मदने व दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष गणेश कविटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम राबवला. पोलिसांना दिलेला हा छोटासा दिलासा आमच्यासाठीही मोठा आनंद आहे.”
यावेळी अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार विजय उंडे, सुहास कुलकर्णी,दत्ता जगताप, मुश्ताक पठाण, सर्जेराव साळवे, राजू शेख, गणेश कांबळे उपस्थित होते. गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत लोकांच्या सुरक्षिततेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या पोलिसांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे उमटलेले समाधानाचे हसू हेच खरे बक्षीस ठरले.
प्रतिनिधी – गणेश कविटकर



