समृध्‍दी महामार्गाच्‍या शिर्डी ते भरवीर या ८० कि.मी लांबीचा दुसरा टप्‍पा म्‍हणजे उत्‍तर महाराष्‍ट्राच्‍या विकासाचा मानबिंदू – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

महाराष्‍ट्राला समृध्‍द करणा-या हिंदूहृदय संम्राट महाराष्‍ट्र समृध्‍दी  महामार्गाच्‍या शिर्डी ते भरवीर या ८० कि.मी लांबीचा दुसरा टप्‍पा म्‍हणजे उत्‍तर महाराष्‍ट्राच्‍या विकासाचा मानबिंदू ठरेल असा विश्‍वास महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. पश्चिम व उत्‍तर महाराष्‍ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला जोडला जाणारा विकासाचा सुवर्ण त्रिकोण ठरणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
       समृध्‍दी महामार्गावरील नागपुर ते शिर्डी या पहिल्‍या टप्‍प्‍याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाले होते या मार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचण्‍याचा सुखद अनुभव सर्वांना मिळाला. आता या महामार्गाचा दुसरा टप्‍प्याचे लोकार्पण मुख्‍यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्‍या उपस्थितीत होत असून, नगर जिल्‍ह्याच्‍या विकासात्‍मक दृष्‍टीने ऐतिहासिक घटना आहे. संमृध्‍दी महामार्गाचे काम वेगाने पुढे जात आहे. त्‍याच पध्‍दतीने जिल्‍ह्याच्‍या विकासालाही या मार्गामुळे गती मिळेल असे सांगून मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, पहिल्‍या टप्‍प्याचे उद्घाटन झाल्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सहकार्याने मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्‍सप्रेस रेल्‍वे गाडी सुरु झाली. आता संमृध्‍दी महामार्गाच्‍या दुस-या टप्‍प्‍याचीही होत असलेली सुरुवात ही जिल्‍ह्याच्‍या दळणवळणाच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण बाब ठरेल.


       दुस-या टप्‍प्‍यातील या महामार्गाचा लाभ सिन्‍नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्‍ह्यासह त्‍या गावातील नागरीकांना मोठा उपयोग होईल. घोटी पर्यंतचे अंतरही कमी होणार असून, या भागातील शेतक-यांच्‍या शेतीमालाची वाहतूकही अतिशय कमी वेळात होईल याकडे लक्ष वेधून या महामार्गाची अहमदनगर जिल्‍हृयाची लांबी २९.४० कि.मी असून शिर्डी व अहमदनगर परिसरातील कृषि उद्योगांसह इतर व्‍यवसायांनाही चालना मिळून रोजगारवृध्‍दीच्‍या दृष्‍टीने या महामार्गावरील दळणवळण उपयुक्‍त ठरणार आहे. भविष्‍यात लवकरच या भागात लॉजेस्‍टीक पार्क, आयटी पार्क आणि शेतीपुरक उद्योगाच्‍या  उभारणीसाठी महत्वपूर्ण निर्णय होणार आहे. जिल्‍ह्यातील औद्योगिक विकासासाठी सुध्‍दा संमृध्‍दी महामार्गाचे मोठे सहकार्य होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.दरम्‍यान खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज आधिका-यां समवेत उद्घाटन स्‍थळाची पाहाणी करुन, कार्यक्रमाच्‍या नियोजनाबाबत आधिका-यांना सुचना दिल्‍या. याप्रसंगी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्‍यासह रस्‍ते विकास व सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

(प्रतिनिधी – लखन गव्हाणे, शिर्डी)