जयंती महोत्सवानिमित्त शनिवारी माजी मंत्री यशोमती ठाकूर, रविवारी लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर संगमनेरात

 थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त  शनिवार दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12 वा. माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार असून रविवारी सकाळी 11 वाजता आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरीताई कानिटकर व लीना बनसोड ह्या युवतींशी संवाद साधणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे व कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी अत्यंत उत्साहात शानदार कार्यक्रमात जयंती महोत्सव संपन्न होत असतो. शुक्रवारी राजस्थानचे मुख्यमंत्री नामदार अशोक गहलोत, माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थिती पुरस्कार वितरण होणार आहे.तर शनिवार दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12 वा. माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ताई ठाकूर यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प.शिवानी ताई व मुक्ताताई चाळक यांच्या कीर्तनाची जुगलबंदी होणार आहे.

तसेच रविवार दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वा. संगमनेर तालुक्यातील व शहरातील युवतींना करियरसाठी मार्गदर्शन करण्याकरीता भारतीय लष्करातील अतिविशिष्ट सेवा पदक विजेत्या आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरीताई कानिटकर व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड या उपस्थित राहणार आहेत. तरी या दोन्ही कार्यक्रमांसाठी संगमनेर तालुक्यातील विविध महिला पदाधिकारी, बचत गटाच्या महिला, महाविद्यालयीन युवती,करिअर अकॅडमी मधील युवती व महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एकविरा फाउंडेशन व जयंती महोत्सव समिती आणि अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.