जंगलातील झाडाला गळफास घेत शेतकऱ्याची आत्महत्या

संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागातील हिवरगांव पठार गावच्या शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेत ४७ वर्षीय कारभारी उर्फ दादू आंबु चितळकर यांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दिनांक २९ एप्रिल रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.
कारभारी उर्फ दादू आंबु चितळकर हे साकुर परीसरातील चितळकरवस्ती येथील रहीवासी आहेत तर त्यांनी हिवरगांव पठार गावच्या शिवारातील हिवरगांव पठार घाटाजवळ रोडच्या कडेला जंगलामध्ये लिंबाच्या झाडाला दोर बांधून आत्महत्या केली . ही माहिती काही नागरीकांना समजताच नागरीकांनी याची माहिती चितळकर यांच्या घरी दिली तर घटनेची माहिती समजताच घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष खैरे ,गणेश लोंढे ,संतोष फड यांसह आदिंनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह खाली उतरुन संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला.
बाळु भागा चितळकर यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ वायाळ करत आहेत.
दरम्यान कारभारी चितळकर यांनी आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही. गेल्या तीन महिन्यांपासून घारगांव पोलीस स्टेशन हद्दीत दहा ते बारा जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तर आत्महत्यांचे वाढलेले प्रमाण पाहता सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन याविषयीचे चर्चा सत्र आयोजित करुन समुपदेशन करणे गरजेचे आहे. व नागरीकांनीही आत्महत्या करणे म्हणजे सर्वच प्रश्न सुटले असे नाही तर थोडासा विचार करून आपल्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे असे सर्व सामान्य जनतेतून बोलले जात आहे.
(प्रतिनिधी – नवनाथ गाडेकर,घारगाव)