कोपरगाव, श्रीरामपूर आणि संगमनेर आगारातील एस.टी कामगारांनी घेतली माजी मंत्री आ.विखे पाटील यांची भेट, कामगारांनी केलेल्या मागणीनुसार किराणा साहित्य देणार – आ.विखे पाटील

महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला असला, तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही सर्व कामगारांनी आजपर्यंत दाखविलेली एकजूट महत्वपूर्ण आहे. शेवटच्या कामगाराला न्याय मिळेपर्यंत कराव्या लागणाऱ्या सर्व लढाईत मी तुमच्याबरोबर आहे. तुमच्या या दुखवटा आंदोलनाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही माजी परिवहन मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
कोपरगाव, श्रीरामपूर आणि संगमनेर आगारातील सर्व कामगारांनी लोणी येथील जनसेवा संपर्क कार्यालयात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवून आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. सर्व कामगारांच्या समस्या जाणून घेत आमदार विखे पाटील यांनी त्यांना दिलासा देवून, तुमच्या सुरु असलेल्या सर्व लढाईत मदत करण्याचे आश्वासन दिले.
एसटी कामगारांच्या संपाबाबत महाविकास आघाडी सरकारने सहानूभुतीने विचार करुन न्याय देण्याची गरज होती. पंरतू पहिल्यापासूनच हा संप मोडून काढण्यासाठीच सरकारचे प्रयत्न होते. संपाच्या कालावधीत असंख्य कामगारांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपविले. तरीही सरकारला कोणतीही सहानुभूती नसल्याबद्दल आ.विखे यांनी खेद व्यक्त केला.
आता कंत्राटी कामगारांच्या नियुक्त्या करुन महामंडळाच्या बसेस सुरु झाल्या असल्या, तरी अद्यापही सर्वच ठिकाणी कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सरकारने संप मोडून काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले असले तरी, तुमच्यासारख्या कामगारांनी आंदोलनात दाखविलेली एकजूट महत्वपूर्ण आहे. तुमच्या या आंदोलनास पहिल्यापासूनच पाठींबा दिलेला आहे. आंदोलन सुरु असताना, संगमनेर येथे कामगारांची भेटही घेतली होती. त्यावेळेस न्यायालयीन लढाईसाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य देण्याचे मी जाहीर केले होते. त्याची कार्यवाहीसूद्धा झाली. भविष्यातही शेवटच्या कामगाराला न्याय मिळेपर्यंत सर्वोतोपरी माझे सहकार्य तुमच्या या आंदोलनाला राहिल असा दिलासा आमदार विखे पाटील यांनी या कामगारांना दिला.
असंख्य कामगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याने नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून पगारही बंद झाल्याने यासर्व कामगारांसमोर उदरनिर्वाहाचे मोठे प्रश्न उभे राहिले आहे. कामगारांनी केलेल्या मागणीनुसार आ.विखे पाटील यांनी किराणा साहित्य देण्याचे मान्य केले.

(प्रतिनिधी – लखन गव्हाणे,लोणी)

Leave a Reply