संगमनेर येथील प्रयोगशील आणि उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

संगमनेर येथील प्रयोगशील, उपक्रमशील आणि प्रामाणिकपणे शैक्षणिक क्षेत्रात पवित्र ज्ञानदानाचं काम करणाऱ्या शिक्षिका वृषाली कडलग यांना जिल्ह्यातील महत्वाचा आणि मनाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. एका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षिकेची पुन्हा एकदा निवड झाल्याने वृषाली कडलग यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संगमनेर तालुक्यातील धुमाळवाडी येथील शाळेचे मुख्याध्यापक आणि जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक दिगंबर फटांगरे आणि सी न्यूज मराठी चॅनेलचे संचालक बाळासाहेब गडाख यांनी वृषाली कडलग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत वृषाली कडलग यांचा सत्कार केला.
संगमनेर तालुक्यातील देशमुखमळा (धांदरफळ ) शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ. वृषाली सुनील कडलग यांना जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. वृषाली कडलग यांनी लोकसहभागातून शाळेचा सर्वांगीण विकास केला आहे. देशमुखमळा शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे इंग्रजी माध्यमाच्या मुलांचाही या शाळेकडे ओढा वाढला आहे. ही द्विशिक्षकी शाळा कडलग यांच्या पुढाकारातुन आय.एस.ओ. मानांकितही झाली आहे.
कडलग यांचे शाळेसाठीचे योगदान बघून गावातील लोकांनी राजकारणाचे जोडे बाहेर ठेऊन शाळेला आर्थिक मदत केली. त्यातून कला मंच , प्रवेशद्वार , कंपाऊंड , मुलांसाठी खेळणी आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.रोटरी, इनरव्हिल क्लब सारख्या सामाजिक संस्थाची मदत मिळवून कडलग यांनी रोटरी ई-लर्निंग डिजिटल क्लासरूम, रोटरी वाचनालय, रोटरी हॅन्ड वॉश स्टेशन हे प्रकल्प राबविले आहेत. त्याशिवाय गांडूळ खत प्रकल्प, औषधी वनस्पती, सोनू – मोनू बचत बँक प्रकल्प, शुद्धलेखन प्रकल्प, कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर ‘ शाळा बंद मात्र शिक्षण चालू ‘ यासाठी रोटरी क्लबचे सहकार्य मिळवून कडलग यांनी विध्यार्थ्यांना रोटरी डिजिटल स्कूल टॅब मिळवून दिले.
ऑनलाईन शिक्षणासोबतच ऑफलाईन शिक्षणासाठी सौ .कडलग यांनी मुलांना त्यांच्या घरी जाऊन मदत केली आहे. त्यामुळे कोव्हीडच्या पार्श्वभूमीवरही विध्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या संगमनेर तालुक्यातील शाळांचे सर्वेक्षण करून २१ गरजू शाळांना इनरव्हिल क्लबच्या माध्यमातून ई- लार्निग डिजिटल क्लासरूम प्रकल्प , शैक्षणिक साहित्याची मदत , गरजेनुसार बांधकाम साहित्य , खेळाचे साहित्य अशी मदत मिळवून देण्यात कडलग यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तत्कालीन इनरव्हील इंडियाच्या प्रेसिडेंट हिल्टन पेट्रेशिया यांनी कडलग यांच्या निमगाव भोजापुर शाळेला सदिच्छा भेट देऊन कडलग यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरवही केला होता.
वृषाली कडलग या संगमनेर येथील इनरव्हील क्लबच्या संचालिका असून सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. जिजाऊ बिग्रेडच्या माध्यमातून त्यांनी वधुवर मेळाव्यांच्या आयोजनातही योगदान दिले आहे व महिला सक्षमीकरणासाठी कार्य केले आहे. राज्यस्तरावर प्रकाशित होणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकी’ या मासिकाच्या संपादक मंडळावर कडलग या कार्यरत आहेत. वृषाली कडलग या सामाजिक कार्यकर्ते व आर्थिक सल्लागार सुनील कडलग यांच्या पत्नी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *