संगमनेर – लोकसहभागातून रस्त्यावर मुरूम टाकून बुजवले खड्डे

संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी ते घारगाव या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांसह छोट्या मोठ्या वाहन चालकांनाही मोठी कसरत करावी लागत होती, त्यामुळे अखेर शेळकेवाडी ग्रामस्थांनी या रस्त्यावर लोकसहभागातून मुरूम टाकला आहे. त्यासाठी त्यांना जिल्हा परिषदेतील काॅग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून जेसीबी उपलब्ध करून दिला.


शेळकेवाडी ते घारगाव हा रस्ता दळण-वळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. शेळकेवाडी, कान्होरे मळा, अकलापूर आदि भागातील विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि छोट्या-मोठ्या वाहन चालकांना याच रस्त्याने ये-जा करावी लागत आहे, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची अक्षरशः वाट लागली होती. पावसाळ्यात तर संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला होता, मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहने चालवने सुद्धा अवघड झाले होते , त्यामुळे शेळकेवाडी ग्रामस्थ चांगलेच वैतागले होते. अखेर ग्रामस्थांनी लोकसहभागातून रस्त्यावर मुरूम टाकण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार ग्रामस्थांनी टॅक्ट्रर उपलब्ध केले मात्र मुरूम काढण्यासाठी जेसीबी गरजेचा होता तो जिल्हा परिषदेतील काॅग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांनी संगमनेर कारखान्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला त्यामुळे ग्रामस्थांनी टॅक्ट्रर आणले आणि जेसीबीच्या माध्यमातून या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला आहे. आता या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांसह छोट्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागणार नाही. मात्र या रस्त्याचे लोकप्रतीनिधींनी लक्ष घालुन लवकरच पक्के डांबरीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
(नवनाथ गाडेकर – प्रतिनिधी – घारगाव,ता.संगमनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *