संगमनेरच्या हिवरगाव पावसा टोल नाक्यावर टोल वसुली न करण्यासाठी आंदोलन

केंद्र सरकारने पारित केलेले कृषी आणि कामगार विधेयक हे शेतकऱ्यांबरोबरच कामगारांवर अन्याय करणारे आहेत, ही विधेयके तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी संगमनेरजवळील नाशिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं या विधेयकाचा निषेधही करण्यात आला.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी करण्यात आली. तसेच देशव्यापी शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून कोणत्याही वाहनांकडून टोल वसूल करु नये याबाबतचे निवेदनही हिवरगाव पावसा टोलनाका प्रशासनाला देण्यात आले.
समाजवादी जनपरिषद, संगमनेर तालुका अंगणवाडी कर्मचारी सभा, भारतीय कम्युनिष्ठ पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना व फॉरेस्ट वाहतुकदार सभा यांच्यावतीने अंगणवाडी कर्मचारी सभेच्या प्रदेशाध्यक्षा निशा शिवूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले..


किसान संघर्ष समितीने देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 12 डिसेंबरला देशातील सर्व टोलनाक्यांवर ‘टोलबंद’ आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आज हे आंदोलन छेडण्यात आले आहे. तर केंद्र सरकारने पारित केलेले तिन्ही काळे कृषी कायदे आणि कामगार कायदे तात्काळ रद्द करावेत, शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदा करावा, नवीन कृषी धोरणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि दिवसभर टोलवसुली करु नये अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
या आंदोलनात कॉ.ज्ञानदेव सहाणे, शांताराम गोसावी, अनिल गुंजाळ, अनिल कढणे, सुनंदा रहाणे, प्रा.शिवाजी गायकवाड, बाबुराव गायकवाड, दशरथ हासे, भास्कर पावसे आदिंसह महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान, महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून चोख बंदोबस्त ठेवला होता.
(वृत्तसंकलन विभाग संगमनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *