भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जगाच्या इतिहासात मोठे स्थान – आ.डॉ.तांबे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात असलेली सर्वात मोठी लोकशाही भारतीयांना दिली असून समता व बंधुतेची शिकवण देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जगाच्या इतिहासात मोठे स्थान असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे व संगमनेर शहरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अमृत उद्योग समूहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,माणिकराव यादव, बाळासाहेब गायकवाड आदींसह विविध पदाधिकारी होते.
याप्रसंगी आमदार डॉ तांबे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक थोर राष्ट्र पुरुषांनी योगदान दिले असून या सर्वांच्या त्यागातून,बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. जगात सर्वात मोठी लोकशाहीची देण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना दिली. समता व बंधुतेची शिकवण देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ, इतिहासतज्ञ व तत्त्वज्ञ होते. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मंत्र देताना समाजातील प्रत्येकासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे असून शिक्षणातूनच प्रगती होते आहे याची प्रेरणा सर्वांना दिली. त्यांचे विचार हे तरुण पिढीने अखंडपणे पुढे नेण्याची गरज असल्याचे आमदार डॉक्टर तांबे यांनी म्हटले आहे. तर नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे म्हणाले की ,भारताला मोठ्या राष्ट्रपुरुषांच्या विचारांची देण असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता व बंधुता ही शिकवण दिली आहे त्यांचे भारताच्या इतिहासात व जगाच्या इतिहासात मोठे स्थान असून त्यांच्या विचारांची जगाला गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.
( संगमनेर वृत्तसंकलन)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *