काँग्रेसचे जेष्ठ नेते हरिभाऊ वर्पे यांचे दुःखद निधन

संगमनेर (प्रतिनिधी) सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे निष्ठावंत सहकारी आणि वारकरी संप्रदायाचे पाईक व निवृत्ति महाराज पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष संगमनेर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती हरिभाऊ वर्पे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

 हरिभाऊ वर्पे यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार   डॉ. सुधीर तांबे यांनी शोक व्यक्त केला असून अमृत उद्योग समूह  व संगमनेर तालुक्यातून शोक व्यक्त होत आहे.

 हरिभाऊ वर्पे हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे निष्ठावंत विश्वासू कार्यकर्ते होते .अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचे काम करताना त्याने संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्षपदही अनेक वर्ष भुषवले. अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांमध्ये विविध पदावर काम केले. तसेच  संगमनेर तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून उल्लेखनीय काम केले. याच बरोबर आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा वारसा जपत त्यांनी निवृत्तीनाथ महाराज त्रंबकेश्वर ट्रस्टचे तीस वर्ष विश्वस्त पदही सांभाळले.  निवृत्ती महाराज पालखी  व पायी दिंडी  समिती अध्यक्ष होते. दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी चे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर यामध्ये आयोजन व नियोजनात त्यांचा मोठा सहभाग असायचा .वृद्ध काळातही अनेक वर्षे त्यांनी सातत्याने नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुकाभर काम केले. सडपातळ शरीरयष्टी असताना अगदी दोन वर्षापर्यंत ते स्वत: मोटर सायकल व चार चाकी वाहने चालवत होते. अत्यंत शिस्तबद्ध वागणे ,स्वच्छ पेहराव आणि काँग्रेसचे एकनिष्ठ असलेल्या हरिभाऊ वर्पे यांचे चिकणी येथे राहत्या घरी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले .त्यांच्या पश्चात दूध संघाचे संचालक विलास वर्पे यांसह चार मुले, एक मुलगी ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *