अवघ्या ७२ तासात खून प्रकरणाचा उलगडा.

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील लता मधुकर शिंदे यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पर्यत पोहचण्यात बेलवंडी पोलिसांना यश आले असून ,अतिशय क्लिस्ट या खून प्रकरणाचा अवघ्या ७२ तासात उलगडा करण्यात आला आहे. या खून प्रकरणात मुकेश मोतीलाल गुप्ता वय २८ रा.मेहबूबपुरा,जि.भदोई,उत्तरप्रदेश हल्ली रा बेलवंडी झोपडपट्टी याला अटक करण्यात आली आहे.
३ डिसेंबर रोजी डोक्यात टनक वस्तू मारून लता मधुकर शिंदे वय ५६ या महिलेचा खून करून तिचा मृतदेह विसापूर शिवारातील नंदिमळ्यातील उसाच्या शेतात टाकून दिल्याची घटना घडली होती. या खुनाच्या घटनेबाबत मयत महिलेचा भाऊ बाळू शिंदे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीने खून करताना कुठलाच पुरावा मागे ठेवला नसल्याने या गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान बेलवंडी पोलिसांसमोर होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलिस निरिक्षक अरविंद माने यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी तपास पथके तयार करून तपासचक्र वेगाने फिरवले जात होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके व त्यांचे पथक देखील यातील आरोपीचा शोध घेत होते . तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ३ डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मयत महिला त्या रस्त्यावरून जाताना आढळून आली होती त्यानंतर एक मिनिटांच्या अंतराने आरोपीही मागे जाताना आढळून आला. असे जरी असले तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही व्यक्ती स्पष्ट होत नव्हती.याच दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक स्कुटर रस्त्याच्या बाजूला लावल्याचे दिसून आले. पोलिसांनी घारगाव, कोळगाव, पिंपळगाव पिसा, पारगाव, बेलवंडी या भागात काही भंगार विक्रेत्यांकडे याबाबत चौकशी केली मात्र तपासाच्या दृष्टीने काही मिळाले नाही. या खून प्रकरणातील जो आरोपी होता तो स्कुटर सह पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपणच त्या महिलेचा खून केल्याची कबुली दिली.
या खून प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, पोलीस नाईक दादासाहेब क्षीरसागर यांच्या पथकाने अवघ्या ७२ तासात या खून प्रकरणाचा उलगडा केला.
(गणेश कविटकर,श्रीगोंदा प्रतिनिधी)

Leave a Reply